चंद्राचं खळं

आकाशात ढगांतील हिमकणांमुळे जी विविध प्रकारची तेजोवलये तयार झालेली दिसतात त्यामध्ये चंद्राचे खळे (Halo) हे एक सुंदर दृश्य आहे. ह्यामध्ये सूर्य किंवा चंद्राभोवती आकाशात अंदाजे २२° त्रिज्येचे वर्तुळाकार तेजस्वी कडे तयार झालेले दिसते. अशा कड्याला खळे म्हणतात.

आकाशात तंतुमेघ किंवा तंतुस्तरमेघ आले असता सूर्यप्रकाश किंवाइ चंद्राचे चांदणे / किरण  जेव्हा ह्या ढगातील सूक्ष्म पण लक्षावधी षटकोनी हिमकणातून आरपार जातात तेव्हा त्यांचे वक्रीभवन होते आणि असे खळे दिसते. २२° खळे हे बरेच मोठे म्हणजे आपला हात आकाशात सूर्य किंवा चंद्राच्या दिशेने  पूर्ण लांब केला असता पसरलेल्या तळहाताएवढी अंदाजे त्रिज्या असेल तेवढे दिसते. असे खळे हे सर्वसाधारणपणे आकाशात बऱ्याच वेळा म्हणजे इंद्रधनुष्य दिसते त्यापेक्षा जास्त वेळा दिसते.

खळ्याची निर्मिती

जेव्हा प्रकाशकिरण ६०° शिरोकोन असणाऱ्या षटकोनी हिमकणातून आरपार जातात तेव्हा त्यांचे दोनदा वक्रीभवन होऊन ते २२° ते ५०° कोनातून वळतात. त्यांचा वळण्याचा कमीत कमी कोन हा अंदाजे २२° ( लाल तरंग लहरींसाठी अचूक २१.८४° तर नील तरंगांसाठी २२.३७°) असतो . प्रत्येक तरंगांसाठी हा कोन वेगळा असल्याने अशा खळ्यातील आतील कड लालसर तर बाहेरील कडा निळसर दिसते.

अशा हिमकणांमुळे सर्वच प्रकाशाचे वक्रीभवन होते पण ठरावीक ठिकाणाहून बघणाऱ्याला त्यापैकी फक्त २२° तून वळलेल्या प्रकाशाचेच कडे दिसते. २२°’पेक्षा कमी कोनातून प्रकाशाचे वक्रीभवन होत नसल्यामुळे अशा कड्याच्या आत प्रकाश नसतो व त्यामुळे आतील आकाश मात्र काळे दिसते.

२२° चे खळे हा तसा अनेकदा दिसणारा परिचित देखावा असला तरी ज्यामुळे तो दिसतो त्या हिमकणांचा खरा आकार आणि त्यांची स्थिती ह्याबद्दल वैज्ञानिकांमध्ये अजूनही एकमत नाही. षटकोनी आकारातील अस्ताव्यस्त स्थितीतील हिमकण अशा खळ्याला कारणीभूत होतात असे सर्वसाधारण मत नेहमी दिले जाते पण असे हिमकण त्यांच्या वायगतिकीय (aerodynamic) गुणधर्मांमुळे अस्ताव्यस्त स्थितीत न राहता समांतर स्थितीत असतात. त्यामुळे खळ्याच्या निर्मितीमागे फक्त हेच कारण असेल ह्याबद्दल एकमत झालेले नाही. ढगातील बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे हिमस्तंभांचे समूहही हे खळे तयार होण्यास कारणीभूत ठरत असावेत असा कयास आहे.

जनमानसातील समजुती

जनमानसात चंद्राभोवती पडणाऱ्या खळ्याबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत. येणाऱ्या वादळाची ती चाहूल असते ही त्यापैकीच एक. इतर तेजोवलये किंवा खळ्याप्रमाणे २२° खळीसुद्धा आकाशात  तंतुमेघ किंवा तंतुस्तरमेघ आले असतानाच दिसतात आणि बऱ्याचदा एखादे मोठे वादळ येण्यापूर्वी काही दिवस काही वेळा ह्या ढगांचे आगमन होते. त्यामुळे ह्या समजुतीला असा तोडका मोडका काहीतरी आधार आहे असे म्हटले तरी चालेल. पण असे ढग काही वेळा वादळाची शक्यता नसतानाही येऊ शकतात. त्यामुळे हे खळे म्हणजे वादळाचे पूर्वचिन्ह असे खात्रीलायक म्हणता येत नाही. दुसरी समजूत म्हणजे असे खळे हे राजाला वाईट असते. ही समजूत कशी काय निर्माण झाली हे कळणे कठीण. पण नाहीतरी आताच्या युगात राजा आणि त्याचं राज्य अशा गोष्टी राहिलेल्या नाहीत. त्यामुळे अशा समजुतींकडे दुर्लक्ष करून आपण आकाशात दिसणारा हा दुर्लभ पण सुंदर देखावा शक्य तेव्हा पाहावा हेच उत्तम.

Source: Wikipedia

Leave a Reply